मुंबई – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज भाजप सदस्यात्वचा राजीनामा दिला. यावर भाजपने प्रतिक्रिया दिली असून खडसेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले कि, एकनाथ खडसे यांच्यासोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांचा निर्णय ठरलेला असल्यामुळे खडसेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असल्याचे म्हंटले आहे.
तसेच, पक्षातून कोणताही नेता अथवा कार्यकर्ता बाहेर पडतो त्याचा आनंद निश्चित नसतो. एकनाथ खडसेंवर अन्याय झाला की नाही हा व्यक्तिसाक्षेप निर्णय असू शकतो, एकनाथ खडसेंच्या संपर्कात प्रदेशाध्यक्ष सातत्याने होते, कोणताही त्रास संघटनेला होणार नाही, असा निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले.
खडसे पक्ष सोडणार नाही अशी शेवटपर्यंत आम्हाला आशा होती. परंतु, त्यांचा निर्णय झाला असावा. एकनाथ खडसेंसाठी संघटनेने जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे भाजपने स्पष्ट केले.