पिंपरी – कामवाली बाई कामासाठी आली नाही. या अत्यंत शुल्लक कारणावरून उच्चशिक्षित दाम्पत्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे चिडलेल्या पत्नीने घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड येथे घडली.
मेघा संतोष पाटील (वय 35, रा. माणिक कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा या एका आयटी कंपनीत उच्चपदावर नोकरी करत होत्या. तर त्यांचे पती डॉक्टर आहेत. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. या उच्चशिक्षित दाम्पत्याचे कामवाली बाई घरकामासाठी आली नसल्याच्या कारणावरून शनिवारी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर, रागाच्या भरात मेघा यांनी राहत्या घराच्या गॅलरीमधून खाली उडी मारली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.