नवी दिल्ली – अमरनाथ यात्रेच्या अखेरच्या टप्प्यातील पवित्र छडी मुबारक पवित्र गुहेपर्यंत नेण्यात आली आणि याबरोबर यावर्षीच्या अमरनाथ यात्रेची समाप्ती झाली. जम्मू काश्मीरमध्ये करोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याने यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.
मात्र केवळ धार्मिक भावनांचा आदर राखण्यासाठी अमरनाथ यात्रा मंडळाने श्री अमरनाथच्या सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली होती. अमरनाथ गुहेतील पारंपारिक धार्मिक विधी नेहमीप्रमाणे याही वर्षी सुरूच होते.
श्रावण-पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्वामी अमरनाथ भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे छरी-मुबारक महंत दीपेन्द्र गिरी जी यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगरच्या दशनामी अखाड्यातून श्री अमरनाथच्या पवित्र दर्शनासाठी हेलिकॉप्टरमधून नेण्यात आली.
यावेळी पारंपारिक धार्मिक विधी, शिवस्तोत्रांबरोबर भगवान शंकराची भजनेही गायली गेली. यावेळी काही निवडक मठांमधील साधूंचीच उपस्थिती होती. करोनाच्या साथीमुळे सर्वसामान्य भाविकांसाठी यंदा यात्रेसाठी परवानगी नाकारण्यात आली होती. छडी मुबारकच्या दर्शनानंतर यावर्षीची यात्रेची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले.