वाई -बाजार पेठेतील एक व्यापारी व राष्ट्रीयीकृत बॅंकेचे चार कर्मचारी करोनाबाधित झाल्याने तसेच करोनामुळे एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने बाजारपेठेत खळबळ उडून वाईकरांची झोपच उडाली आहे. एकाच वेळी सहा नवे रुग्ण सापडल्याने वाईवर करोना संकट ठळक झाले आहे. त्यामुळे वाईतील बाजारपेठ 28 दिवसांसाठी कंटेंनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. वाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या किसन वीर चौकात तसेच संपूर्ण बाजारपेठेत रोज नवीन रुग्ण सापडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे पालिका प्रशासन हतबल झाले आहे.
हे सर्वजण मुंबई- पुण्याहून आपल्या धंद्यासाठी माल खरेदीसाठी गेले असल्याने करोनाचा संसर्ग झाला आहे. तर बॅंकेतील पॉझिटिव्ह रुग्णामुळे पाच कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बॅंकेचे सर्व व्यवहार बंद आहेत. बॅंकेचा कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने सर्व कर्मचारी विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून वाई तालुक्यात जीवनावश्यक व्यवहार सोडले तर लागण होण्याच्या भीतीने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत.
वाई शहरासह संपूर्ण तालुका 100 टक्के बंद ठेवण्यात आला आहे. वाई तालुक्यातील काही गावांत दररोज नवीन बाधित सापडत असल्याने तालुक्याची धडधड वाढत चालली आहे. शनिवारी आलेल्या अहवालानुसार वाई तालुक्याला करोनाने मोठा धक्काच दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आदेशावरून कंटेंनमेंट झोन जाहीर केला आहे. शहरात व्यापारीच करोनाबाधित झाल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी वाई शहरात येऊन गर्दी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाला दुचाकी व चारचाकीतून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.