निगेटिव्हची वैधता 100 तर पॉझिटिव्हची वैधता 50 टक्केच
सोमवारपासून सुरू होणार चाचण्या
पुणे – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तब्बल एक लाख नागरिकांच्या रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने तब्बल साडेचार कोटींची एक लाख किट खरेदी केली असून या किटच्या वैधतेसाठी एनआयव्हीकडे पाठविलेल्या चाचणी नमुन्यांचा अहवाल अखेर महापालिकेला प्राप्त झाला आहे. पालिकेने वैधता तपासण्यासाठी सुमारे 28 जणांची चाचणी केली होती. त्यात 6 जणांचे अहवाल बाधित आले होते. याच 6 जणांचे नमुने महापालिकेने एनआयव्हीकढेही पाठविले होते. मात्र, एनआयव्हीच्या अहवालात 6 मधील 3 जणांचेच नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या ऍन्टीजेन टेस्ट किटची निगेटिव्ह वैधता 100 टक्के आली असून पॉझिटिव्ह अहवालांची वैधता मात्र 50 टक्केच आली आहे.
जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करून लक्षणे नसलेल्या रुग्णांना वेळीच वेगळे करण्यासाठी आयसीएमआरने मान्यता दिलेल्या रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आयसीएमआरने या किटचे दर 450 ठरविले. या दरानुसार, केंद्राने मान्यता दिलेल्या संस्थेकडून पालिकेकडून सुमारे साडेचार कोटींची कीट खरेदी केली आहे. या कीट पुण्यात दाखल झाल्या असून महापालिकेने त्याची वैधता तपासण्यासाठी पहिल्या दिवशी 28 जणांची करोना चाचणी केली. या चाचणीत 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर सहा जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, त्याच वेळी पालिकेकडून या 28 जणांचे नमुने एनआयव्हीकडेही पाठविण्यात आले होते. अखेर एनआयव्हीचा अहवाल प्राप्त झाला असून एनआयव्हीने 25 जणांचे नमुने निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला त्यात, ऍन्टीजेन टेस्टमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या तीन जणांचाही समावेश आहे.
सोमवारपासून चाचण्यांना सुरुवात…
हा वैधता अहवाल आल्यानंतर महापालिकेने सोमवारपासून या चाचण्या सर्वसामान्य रुग्णांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचण्यांची नोंदणी, त्यांचे अहवाल नोंदणी तसेच त्याचे नियोजन करण्यासाठी उद्या (रविवारी) आरोग्य विभागातील डॉक्टरांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर सोमवारपासून या चाचण्या नियमितपणे सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केले.
आयसीएमआर काय सांगते?
आयसीएमआरच्या निकषानुसार या टेस्टमुळे निगेटिव्ह निदान करण्याचे प्रमाण 99.3 ते 100 टक्के आहे. तर पॉझिटिव्ह निदान करण्याचे प्रमाण 50.6 ते 84 टक्के आहे. त्यातही या चाचणीच्या निकालावर रुग्णाच्या व्हायरल लोडचाही परिणाम होत असल्याने आयसीएमआरने या किटला मान्यता देताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेचा हा अहवाल वैधता निकषात बसत आहे. आयसीएमआरचे टेस्टचे निकष कडक आहेत. त्यामुळे त्याची परिपूर्ती आवश्यक असते.