मुंबई – मुंबई मेट्रो 3 ही मुंबईची महत्त्वाची लाईफ लाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, या मेट्रोमुळे रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे 2.30 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली, त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ 80 दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल.
राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो 3 प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल.
– एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)
हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊन या प्रकल्पाला परवानगी दिली असल्याने पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रास्ताविकाद्वारे मेट्रो 3 ची वैशिष्टे सांगून डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.