PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाचा कार्यक्रम सायंकाळी ४:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी 45 एकरावर सभामंडप उभारण्यात आले आहेत.
या प्रकल्पांचे होणार लोकार्पण
- पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब या नव्याने साकारलेल्या ३९ किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होणार आहे.
- ३२ किमीची अमळनेर-आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाइन व प्रवासी रेल्वेचा शुभारंभ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना या अंतर्गत विदर्भ व मराठवाडा क्षेत्राकरिता सिंचन योजनांचे लोकार्पण होईल.
- वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० चे चौपदरीकरण, सालई खुर्द-तिरोरा महामार्ग क्र. ७५३ प्रकल्प आणि साकोली-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ प्रकल्पाचे लोकार्पण होईल.
- नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित केला जाणार आहे.
- पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एक कोटी नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ होईल.
मोदींचा हा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक राजकीय नेते या कार्यक्रमात हजर राहणार आहेत. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे हे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यानिमित्त पोलिसांचा मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. साडेतीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तासाठी आहे. एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी यांचे पथक याठिकाणी असणार आहे. प्रत्येकाची यावेळी तपासणी करून कार्यक्रमात एन्ट्री दिली जाणार आहे.