बारामती – ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना गोविंदबागेत शनिवारी (दि. 2) रोजी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. नमो रोजगार मेळाव्यानिमित्त (Namo Employment Fair) मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत असणार आहेत. त्यानिमित्त शरद पवार यांनी त्यांना भोजनाचे निमंत्रण दिलेय.
भोजन निमंत्रण पत्रात शरद पवार यांनी नमूद केले आहे की, “आपण शनिवार 2 मार्च रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल.
तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. करीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करत आहोत.
आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग’ ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा,
असं पवारांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.