देशभरात विस्तारण्यासाठी सक्रिय झालेल्या आम आदमी पक्षाने (आप) दिल्ली मॉडेल पुढे केले आहे. साहजिकच, त्या मॉडेलची चर्चा होणार अन् गुजरात मॉडेलशी तुलनाही. दिल्ली मॉडेल राजकीय पटलावर मांडून आपने प्रामुख्याने भाजपशी देशभरात दोन हात करण्याचे रणशिंग फुंकले आहे. भाजपने 2014 मधील लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून केंद्राची सत्ता मिळवली. त्या विजयात भाजपचे पंतप्रधानपदाचे तत्कालीन उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिष्मा निर्णायक ठरला. पंतप्रधान बनण्याआधी मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यातून त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातच्या विकासाचे मॉडेल हा प्रचारातील महत्वाचा मुद्दा बनवला. त्या मॉडेलची मोठी चर्चा झाली. मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्याने गुजरात मॉडेल आता मागे पडले आहे.
अशात आपने दिल्ली मॉडेल समोर आणले आहे. ते आप सरकारने दिल्लीत केलेल्या कार्याशी निगडीत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची शनिवारी हिमाचल प्रदेशमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने दिल्ली मॉडेलवर भर दिला. ते मॉडेल म्हणजे प्रामाणिक आणि विकासाभिमुख सरकार अशी व्याख्या त्यांनी सांगितली. सरकारी शाळांचा सकारात्मक कायापालट, सरकारी रूग्णालयांच्या स्थितीत सुधारणा, भ्रष्टाचार-लाचखोरीचे उच्चाटन हे त्या मॉडेलचे घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुळात, राजकीय क्षेत्रात वेगळेपणामुळे आप हेच एक अभ्यासाचे मॉडेल ठरले आहे. आपचा तो वेगळेपणाही केजरीवाल यांनी हिमाचलमधील सभेत विस्तारपूर्वक मांडला. माझ्यासह आपचे सर्वच नेते आम आदमी आहेत. आम्ही प्रामाणिक आणि सुशिक्षित आहोत. आम्हाला राजकारण करता येत नाही. केवळ रस्ता, पाणी, वीज उपलब्ध करणे आम्हाला ठाऊक आहे. रोजगार उपलब्ध करणेही आम्हाला जमते, असे त्यांनी म्हटले. केजरीवाल यांची ती मांडणी टाळ्या घेणारी आहेच. त्याशिवाय, जनसामान्यांचा मनाचा ठावही घेणारी आहे.
दिल्ली मॉडेल पुढे करूनच आपने नुकतीच पंजाबची सत्ता काबीज केली. त्या पक्षाच्या स्थापनेला पुढील काही महिन्यांत दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. तो कालावधी राजकीय बस्तान बसवण्याच्या दृष्टीने फार मोठा नाही. मात्र, अवघ्या दशकभराच्या कालावधीत दोन राज्यांची सत्ता मिळवण्याची किमया आपने करून दाखवली आहे. त्यामुळे उत्साह दुणावलेला आप दिल्ली मॉडेल देशभरात नेणार असल्याचे सूचित होत आहे.
चालू वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल या राज्यांत विधानसभा निवडणुका होतील. त्या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. त्या राज्यांमधील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर आतापासूनच आप प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यामुळे आप अप्रत्यक्षपणे गुजरात मॉडेललाच आव्हान देऊन दिल्ली मॉडेलचा पर्याय पुढे आणू पाहत असल्याचा निष्कर्ष काढता येईल. काही वर्षांपूर्वी जशी गुजरात मॉडेलची हवा झाली तशी दिल्ली मॉडेलचीही होणार का, याचा प्रत्यय पुढील काळात येईल.