कराड – येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आजपासून प्लाझ्मा संकलन केंद्रास प्रारंभ करण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलच्या तीन कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केला.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपर्यंत प्रभावी औषध निर्माण झालेले नाही.
तसेच त्याच्या प्रतिबंधाची लसही अजून संशोधनाच्या प्रतिक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर करोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात करोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव रूग्णालय असून या थेरपीचा लाभ करोनाग्रस्त रूग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलनासाठी स्वतंत्र प्लाझ्माफेरेसिस युनिट साकारण्यात आले आहे. रक्तातून प्लाझ्मा घटकांचे विलगीकरण करणाऱ्या अद्ययावत यंत्र सामग्रीचीही उभारणी करण्यात आली आहे. शुभारंभादिनी कृष्णा हॉस्पिटलमधील तीन कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केला.
यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विश्वास पाटील, राजेंद्र संदे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलची करोनामुक्तीच्या लढ्यातील कामगिरीचा आदर्शत आहे. त्याचा आदर्श राज्यातील दवाखान्यांनी घेण्याची गरज आहे.