कोपर्डे हवेली -कोपर्डे हवेली, ता. कराड येथील ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्राच्या जागेसाठी ठराव देत नसल्याने येथील युवक व ग्रामस्थांनी शनिवार दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयालगत साखळी आंदोलनास सुरुवात केली.
ग्रामपंचायतीकडे आरोग्य उपकेंद्र होण्यासाठी वेळोवेळी ठराव मिळवा यासाठी मागणी करण्यात आली आहे. तसा पत्रव्यवहारही केला आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीकडून ठराव देण्यात आलेला नाही. दि. 14 सप्टेंबरपर्यंत ठराव देण्यात यावा, अन्यथा लोकशाही पध्दतीने सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करत साखळी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, ग्रामपंचायतीने ठराव न दिल्याने अखेर शनिवार दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता येथील ग्रामस्थांनी साखळी आंदोनलास सुरूवात केली.
यावेळी शेती उत्पन्न बाजारसमितीचे माजी सभापती हिंदुराव चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. साखळी आंदोलन अमित पाटील, दादासो चव्हाण, पैलवान अक्षय चव्हाण, किशोर साळवे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य महेश चव्हाण, शैलेश चव्हाण, विवेक चव्हाण, शिवाजी चव्हाण, संदीप चव्हाण, बापुराव चव्हाण, अशोक साळवे, शुभम चव्हाण, देवदत्त चव्हाण आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.