भुवनेश्वर: देशात करोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नाही. मागच्या आठवड्याच्या शेवटी अचानक बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळालर. दरम्यान, तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. करोना नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याने त्याचा वेग वाढवण्यात येत आहे. या सर्वात चांगली बातमी येत आहे ती म्हणजे देशातील एका शहरात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ओडिशा राज्याची राजधानी आणि मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भुवनेश्वरमध्ये १०० टक्के लसीकरण झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सुमारे एक लाख प्रवासी नागरिकांनाही करोनाची लस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भुवनेश्वर नगरपालिकेचे विभागीय आयुक्त अंशुमन रथ यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भुवनेश्वर शहर हे १०० टक्के लसीकरण झालेले देशातील पहिले शहर ठरले आहे. भुवनेश्वर शहरांत १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ९ लाख ७ हजार आहे. ३१ जुलैपर्यंत भुवनेश्वर शहरांतील नागरिकांचे १०० टक्के करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या शहरात ३१ हजार आरोग्य कर्मचारी असून, ३३ हजार फ्रंटलाइन हेल्थ वर्कर आहेत.
भुवनेश्वर शहरात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्या ५ लाख १७ हजार असून, ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ३ लाख ३० हजार आहे. नगरपालिकेने सुरू केलेल्या अभियानात सर्व नागरिकांना करोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, करोना लसीकरणाचे जुलै महिन्याचे निर्धारित लक्ष्य गाठण्यापासून २.८२ कोटी डोस पिछाडीवर राहिल्याची माहिती समोर आली आहे. जुलैच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारने ५१.६ कोटी लसीचे डोस पुरविण्याचे लक्ष्य ठेवल्याचे म्हटले होते. पण ते पूर्ण होऊ शकलेले नाही. केंद्र सरकारने ३१ जुलैपर्यंत निश्चित केलेले कोरोना लसीकरणाचे लक्ष्य ९४.५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.