मुंबई – कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिच्या विनोदीशैलीमुळे ती खासकरून ओळखली जाते. टीव्ही शो सह ती यूट्यूबवर स्वतःचे चॅनल देखील चालवते. यातून ती तिच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल माहिती देताना दिसते. नुकतेच तिने तिच्या व्लॉगच्या माध्यमातून तिला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे.
बेडवरून पडल्यामुळे भारती सिंहच्या पाठीला दुखापत झाली आहे. ‘माझी पाठ खूप दुखते आहे, मी बेडवरून पडले’ असं म्हणत तिने व्हिडिओ सुरू केला. याबाबत तिने सांगितले की, “जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ती हेड मसाज घेत होती. तिच्या हातात फोन होता आणि तिचे लक्ष विचलित झाल्याने मी अचानक बेडवरून पडले. मात्र पडल्यावर मी स्वतःच खूप हसायला लागले.”
पुढे ती म्हणाली, “ज्यावेळी एखादी वजनदार मुलगी पडते त्यावेळी मी खूपच हसते. मी खूपच उद्धट मुलगी आहे. ज्यावेळी माझ्यासमोर कोण पडतं, त्यावेळी मी हसते आणि त्या व्यक्तीला उठायला मदत सुद्धा करते.” ही घटना सांगताना देखील तिला हसू आवरत नव्हते. तिच्यासाठी हा संपूर्ण किस्सा खूपच मजेशीर होता.
या घटनेनंतर भारतीला पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia )हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. तिकडे तिचे एक्स-रे काढण्यात आले. डॉक्टरांनी भारतीला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तिच्या या व्हिडीओनंतर चाहत्यांंनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र आता ती पूर्णपणे फिट असल्याचे व्लॉगमध्ये दिसत आहे.