सातारा -सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस उद्या, दि. 30 रोजी आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यामुळे वाढदिवसानिमित्त बुधवारी व उद्या, दि. 30 रोजी होणारे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जाहीर केले आहे. वाढदिवस एकदम साधेपणाने साजरा केला जाणार असून गुरुवारी (दि. 30) सायंकाळी 6 वाजता फक्त शुभेच्छा स्वीकारण्यात येणार आहेत. कोणीही पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू देऊ नयेत.
केक कापणे, फटाके वाजवणे वा इतर कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन करून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिवंगत बापट यांना श्रद्धांजली वाहिली.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवस दि. 30 मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातारा-जावळी मतदारसंघात विविध कार्यक्रम सुरू होते. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्यातील विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. हे वृत्त समजताच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 30) वळसे येथे एहसास गतिमंद मुलांची शाळा व रिमांड होम येथे भेट दिली जाणार आहे. गोडोली येथे रक्तदान शिबिर होणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे हे सायंकाळी 6 वाजता कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर फक्त शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यावेळी कोणीही पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू आणू नयेत. केक कापू नये, फटाके वाजवू नये, केवळ शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेला केले आहे. वाढदिवस साधेपणाने साजरा केला जाणार असून, जनता, कार्यकर्ते, हितचिंतकांनी केवळ शुभेच्छा द्याव्यात, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.