सातारा – जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांची सहसंचालकपदी पदोन्नती झाली आहे. वरिष्ठ लेखाधिकारी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) नवी मुंबई येथे श्री. सावंत यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी पारित झाले.
लिंब (ता. सातारा) गावचे रहिवाशी असलेल्या विकास सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत पुण्याच्या महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी. एस्सी ऍग्रीचे शिक्षण झाले. मंडणगड येथे कृषी सहाय्यक म्हणून त्यांनी 2004 मध्ये काम केले. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट- अ या संवर्गात परिविक्षाधिन अधिकारी म्हणून 2007 मध्ये संचालनालय, लेखा व कोषागारे, मुबंई येथे ते रुजू झाले. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट- अ (राजपत्रित) या संवर्गात सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी या पदावर अधिदान व लेखा अधिकारी कार्यालय मुंबई येथे दि. 20 सप्टेंबर रोजी त्यांची पहिली नेमणूक झाली. दि. 31 ऑगस्ट 2010 रोजी उपमुख्य लेखा परीक्षक या पदावर स्थानिक निधी व लेखा, सिंधुदुर्ग या कार्यालयात त्यांची नेमणूक झाली. उपसंचालक सवंर्गात दि. 27 डिसेंबर 2016 रोजी श्री. सावंत यांना पदोन्नती मिळाली.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर जिल्हा परिषद गडचिरोली या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात आली. दि. 27 डिसेंबर 2016 ते दि. 31 ऑगष्ट 2020 या कालावधीत दुर्गम अशा गडचिरोली भागात त्यांनी सेवा बजावली. विकास सावंत यांची गडचिरोली येथून 19 सप्टेंबर 2020 रोजी सातारा जिल्हा परिषदेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर प्रशासकिय बदली झाली.
करोना काळात श्री. सावंत जिल्हा परिषदेत रुजू झाले. अत्यंत शांत,संयमी व कुशल नेतृत्व असणाऱ्या श्री. सावंत यांनी कारभारात सुसुत्रात आणून विविध उपक्रम राबवले. प्रसंगी कठोर परंतु अचूक निर्णय क्षमता असणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सहकार्य भावना जपणारे, भेटीस येणाऱ्या अभ्यागतांच्या शंका जाणून त्यांचे तात्काळ निरसन ते करत होते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून कर्मचाऱ्यांत विश्वास व आपुलकीचे वातावरण त्यांनी निर्माण केले. त्यामुळे त्यांच्यातील संघटन कौशल्य नेहमीच दिसून आले. विकास सावंत यांच्या पदोन्नतीने झालेल्या बदलीची माहिती मिळताच अधिकारी, कर्मचारी, मित्र परिवाराच्यावतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.