नवी दिल्ली – सियाचीन ग्लेशियर भारतासाठी सुरक्षित करणारे कर्नल (निवृत्त) नरेंद्र बुल कुमार यांचे आज निधन झाले. दिल्लीतील आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वयवर्षे 87 होते. वयोमानानुसार त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते.
कर्नल नरेंद्र बुल कुमार हे सियाचिन ग्लेशियरवर पहिल्यांदा पाऊल ठेवणारे लष्करी अधिकारी होते. गिर्यारोहण मोहिमेदरम्यान त्यांनी ही सर्वोच्च कामगिरी पार पाडली होती. या मोहिमेदरम्यान त्यांना अनेक गोष्टी समजून घेता आल्या. मोहिमेवरुन परतल्यानंतर त्यांनी भारताच्या सैन्य आणि राजकीय नेतृत्वाला सियाचिन ग्लेशरचं सामरिक महत्वं समजावून सांगितले.
गिर्यारोहक म्हणून अनेकदा सियाचीन ग्लेशियरवर गेल्याने त्यांनी येथील अनेक निरिक्षण नोंदवून ठेवली होती. ही निरिक्षण सन 1983 मध्ये “इलिस्ट्रेटेड विकली’ या साप्ताहिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. हिमालयातील या सर्वांत उंचावरील पूर्णपणे गोठलेल्या परिसराच्या स्थितीचा आढावा घेणारा हा पहिलाच सार्वजनिक लेख होता.
दरम्यान, कर्नल कुमार यांनी गिर्यारोहणादरम्यान तयार केलेले नकाशे आणि व्हिडिओ याच्या मदतीने भारतीय लष्कराने सन 1984 मध्ये “ऑपरेशन मेघदूत’ लॉन्च केले होते. या मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने सियाचीन ग्लेशियर सुरक्षित केले होते. पाकिस्तानकडून होणाऱ्या आक्रमकतेपासून प्रतिबंधित केले होते.
आपल्या या उत्तुंग कामगिरीसाठी सन 1965 मध्ये कुमार यांना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले. तर लष्कराने त्यांना तिन्ही दलांच्या वतीने परम विशिष्ट सेवा मेडल (पीव्हीएसएम) ने गौरविले होते. तसेच त्यांना कर्नलपदी बढती देण्यात आली होती.
त्याचबरोबर त्यांना लष्कराचं किर्ती चक्र आणि अतिविशिष्ट सेवा मेडलनेही (एव्हीएसएम) गौरविण्यात आले. सियाचीन येथील बटालियन मुख्यालयाचं नंतर त्यांच्या नावावरुन “कुमार बेस’ असे नामकरण करण्यात आले.