पुणे – दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाचे (आय.सी.ए.आय.) उपाध्यक्ष, सीए निहार जांबूसारिया आणि सेंट्रल कौन्सिलचे सदस्य सीए राजेश शर्मा यांनी नुकतीच कॉसमॉस बॅंकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष आणि चार्टर्ड अकाऊंटंटस् इन को.ऑपरेटिव्ह बॅंक्स्चे (सीए.सीओबी) उपाध्यक्ष सीए मिलिंद काळे आणि सीए डॉ. एस.बी. झावर, सचिव आणि बॅंकेचे संचालक सीए यशवंत कासार उपस्थित होते.
सीए.सीओबी या संस्थेच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रास चार्टर्ड अकाऊंटंटस् यांचे महत्व आणि गरज यावेळी सीए जांबूसारिया व सीए शर्मा यांना विषद करण्यात आली. सहकारी क्षेत्रात चार्टर्ड अकाऊंटंट यांना असणाऱ्या संधी यावर पुस्तिका प्रकाशित करण्याबाबत आय.सी.ए.आय. यांनी सहकार्य करावे, त्याचप्रमाणे डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे सहकार क्षेत्राकरिता कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम मेट्रो सिटीजमध्ये आयोजित करण्याबाबत मदत करावी, याबाबत चर्चा करण्यात आली असे बॅंकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले.
सहकारी बॅंकींग क्षेत्रात अंतर्गत लेखापरिक्षक, शाखा प्रमुख, क्रेडीट ऑफिसर्स, बिझनेस ऍनालिटिक हेडस्, रिस्क हेडस्, रिकव्हरी हेडस्, अकाऊँट हेडस्, ऑडिट हेडस् अशासारख्या पदांवर व्यावसायिक चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून संधी उपलब्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.