Cm Yogi Convoy Accident Up: उत्तर प्रदेशातील गोसाईगंजच्या अर्जुनगंजमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यात सर्वात पुढे असलेले अँटी डेमो वाहन उलटले आहे. या अपघातात 5 पोलिसांसह 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथून त्यांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
रस्त्यावर पडलेल्या मृत प्राण्याला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 5 पोलिसांव्यतिरिक्त रस्त्याच्या कडेला उभे असलेले 6 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच डीजीपी प्रशांत कुमार यांच्यासह अनेक अधिकारीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
या अपघाताची माहिती देताना जॉइंट सीपी उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, एकूण 11 जण जखमी झाले आहेत. त्यात 6 सिव्हिल आणि 5 पोलिस कर्मचारी आहेत. सर्वांना सिव्हिल हॉस्पिटलमधून केजीएमसी आणि लोहिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
या अपघाताबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. अँटी डेमो (प्रदर्शन) वाहन स्कॉर्पिओला अपघात झाला आहे. हे जिल्हा प्रशासनाचे वाहन आहे जे मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर कोणतेही आंदोलन होणार नाही याची खात्री करण्यासाठी आगाऊ निघते. अपघाताचा सीएम योगी यांच्या वाहनाशी काहीही संबंध नाही, असे सांगण्यात आले आहे.
अखिलेश यादव यांनी खरपूस समाचार घेतला –
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांनी लगेचच योगी आदित्यनाथ यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “भटक्या जनावरांची समस्या गांभीर्याने न घेतल्याने आज मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यालाच अपघात झाला आणि अनेक लोक जखमी झाले. ही बाब खेदजनक आणि चिंताजनक आहे.”