पूर्वीपेक्षा अधिक जागा निवडून सत्तेवर येणार-मुख्यमंत्री

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल मतदारांनी ठरवला होता. देशाला समर्थ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीच देउ शकतात हा देशातील तमाम जनतेचा विश्वास आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही हेच सरकार पुन्हा निवडून द्यायचा संकल्प जनतेने केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप मित्रपक्षांची महायुती विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भक्कमपणे आणि पूर्वीपेक्षा अधिक जागा घेऊन निवडून सत्तेवर येईल, असा जबरदस्त आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. चर्चगेट येथील गरवारे क्‍लबमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार राज पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेली पाच वर्षे हर्षवर्धन पाटील भाजपात कधी प्रवेश करतील याची आम्ही वाट पाहत होतो. पण त्यांनी अगदी योग्य वेळी पक्षप्रवेश केला आहे. भाजपाच्या जिंकून येणाछया जागांत आता इंदापूरचाही समावेश झाल्याचे सांगून त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचेही संकेत दिले.
दरम्यान, मी कोणतीही अट न घालता भाजपात प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडायची माझी तयारी असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

…तर सुप्रियाताईंना घरी पाठवले असते – चंद्रकांत पाटील
हर्षवर्धन पाटील जर लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी भाजपामध्ये आले असते तर बारामतीबाबतचा संकल्प पूर्ण झाला असता. हर्षवर्धन पाटील खासदार झाले असते. सुप्रियाताईंना घरी पाठवले असते. मात्र ते हुषार राजकारणी आहेत. लोकसभेच्या निकालानंतर बघू असे त्यांनी ठरविले होते.आता पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे.आमची आधीची घोषणा होती अबकी बार 220 पार. पण आता ती घोषणाही मागे पडली असून त्यापेक्षाही जास्त विक्रमी जागा निवडून येणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×