CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. कारण मागील काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्याच्या निवडीवर पक्षामध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच विरोधीपक्ष नेतेपदी कोणीही असले तरी कॉंग्रेस सरकारवर (Congress) त्याचा परिणाम होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सिद्धरामय्या यांनी,‘‘जनतेच्या आशीर्वादाने सरकार स्थापन करणारी काँग्रेस जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करत आहे. सरकार राज्यात द्वेषाचे राजकारण न करता शांततापूर्ण वातावरण निर्माण करत आहे. आज निवडणूक झाली तरी भाजप पुन्हा सत्तेत येईल, हा येडियुराप्पा (BS Yediyurappa) यांचा दावा ह निव्वळ भ्रम आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
भाजपच्या काँग्रेसविरोधातील पोस्टर आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेने भाजपला योग्य धडा शिकवला आहे. भाजप आणि धजदसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. मात्र जनतेने काँग्रेस पक्षाला १३५ जागा दिल्याने त्यांची चिंता वाढली आहे. ते वैतागून निरर्थक विधाने करत आहेत.
कुमारस्वामींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘‘कुमारस्वामी यांनी केलेले आरोप कधीही सिद्ध केलेले नाहीत. ते द्वेष आणि मत्सराचे राजकारण करत आहेत. त्यांच्या खोट्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही.’’असेही त्यांनी यावेळी म्हटले.