मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांनी ५० खोकेचा सपाटा लावला आहे. शिंदे गटाविरोधात सातत्याने ५० खोके एकदम ओके असा प्रचार करताना विरोधक दिसून येतात. आता विरोधकांच्या या घोषणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय. मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,” पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या धाडीत एका अभिनेत्रीकडे २० कोटी रुपये सापडले. ते नेण्यासाठी ईडीला मोठा टेम्पो मागवावा लागला. इथं ५० खोक्यांचा आरोप केला जातोय ५० कोटी नेण्यासाठी एक मोठा ट्रक लागेल. ५० गुणिले ५० म्हणजे किती ट्रक लागतील,हे लपेल का ? हे बोलायचं म्हणून बोलायचं”. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाला. “ते सारखं म्हणतात खोके,त्यांचं बिघडले आहेत डोके” अशा काव्यात्मक अंदाजात आठवले यांनी यावेळी फॅटबाजी केली. यानंतर हाच धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,”आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. त्यासाठी मानसिक उपचार केला जातो. आमच्या ठाण्याला असे मानसिक उपचार रुग्णालय आहे.” असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला.