नवी दिल्ली – अखेर शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. राऊतांना पदावरून हटवून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. यानंतर शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची फेब्रुवारी महिन्यात मुंबईत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव 21 फेब्रुवारीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. आता याबाबतची अधिकृत माहिती आज (23 मार्च) लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड झाल्याने ते संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच कीर्तीकरांचा व्हीप संजय राऊत यांनी न पाळल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अशा स्थितीत संजय राऊत यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यास खासदारकी जाऊ शकते.
संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण 18 खासदार आहेत. यापैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. गजानन कीर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवींद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.
खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार – मंत्री केसरकर
गजानन कीर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. गजानन कीर्तीकर यांनी जरी शिंदे गटात प्रवेश केला, असला तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची निवड केली.