करणी सेनेची निर्मात्यांना आणि वाहिनीला धमकी
मुंबई : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या बिग बॉस या रिऍलटी शो यंदाही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉसच्या सिझन 13 हा अश्लिल कार्यक्रम असल्याचे सांगत करणी सेनेने हा शो बंद करण्याचा इशारा दिला आहे. यापुर्वीही अनेक पक्ष आणि संघटनांकडून हा शो बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यंदाचा बिग बॉसचा 13 वा सिझन सुरू होवून एक महिनादेखील झाला नाही तोच या शोच्या बंदीची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, या शोमध्ये लव्ह-जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोप करत करणी सेनेकडून शो बंद करण्याची मागणी केली आहे.
करणी सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजय सिंह यांनी हा शो बंद करा अन्यथा सेट जाळून टाकण्याची निर्माता आणि वाहिनीला धमकी दिली आहे. तसेच भारतीय संस्कृतीच्या विरोधात हा शो सुरू असल्याचे काही हिंदूत्व संघटनांनी आरोप करत या शोच्या बंदीसाठी मोर्चा उघडला आहे. त्यातच सोशल मीडियावर माहिती प्रसारण मंत्रालय आणि काही राजकीय नेत्यांना टॅग करत हा शो बंद करण्यासाठी निर्मात्यांवर दबाव आणला जात आहे.