गावचा टॅंकर बंद करता आला नाही, त्यांनी मापे काढू नयेत

प्रभाकर देशमुख; माण तालुक्‍यात प्रचाराला सुरुवात, बिदाल गटात दौरा

दहिवडी – ज्यांना स्वतःच्या गावाचा टॅंकर बंद करता आला नाही, त्यांनी माझी मापे काढू नयेत, असा घणाघाती टोला “आमचं ठरलंय’चे उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी लगावला.

अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी काल औंधच्या यमाईचे दर्शन घेवून प्रचारास सुरुवात केली. त्यांनी आज संपूर्ण बिदाल गटाचा झंझावाती दौरा केला. त्या दरम्यान कोपरा बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी मनोज पोळ, सभापती रमेश पाटोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, संदीप महाडिक, बाजार समितीचे संचालक तानाजी मगर, आबासाहेब जगदाळे, सतीश आप्पा जगदाळे, किसन जगदाळे, पांडुरंग जगदाळे, पोपट खरात, प्रमोद खरात, रामभाऊ नांगरे, योगेश भोसले, संतोष भोसले, प्रशांत विरकर, अमोल ओंबासे, यशवंत ओंबासे, किशोर इंगवले, अशोक जगदाळे, आप्पा देशमुख, उदय जगदाळे, मोहन कुलाळ, हणमंत जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, “”निवडणुका आल्या की पाणी आणतो, असे आश्‍वासन देऊन जनतेला भुलवलं जातं. उरमोडीचे पाणी 18 हजार हेक्‍टर क्षेत्राला मिळणे अपेक्षित असतानाही आज फक्त तीन हजार हेक्‍टर क्षेत्राला मिळाले आहे. म्हणजे उरमोडीवर आवलंबून असलेल्या क्षेत्रापैकी अवघे 16 टक्के क्षेत्राला पाणी मिळाले. पास व्हायलाही 35 टक्के लागतात म्हणून हे नापास आमदार आहेत.

सर्व तालुक्‍यात अद्ययावत क्रीडा संकुले झाली असताना माण खटावचे क्रीडा संकुल पूर्ण होऊ शकले नाही. एकही सुसज्ज असे मोठे रुग्णालय नाही. माण- खटावमध्ये फक्त एक गोष्ट झाली ती म्हणजे 2009 पासून क्राईम रेट वाढला. गुन्हे दाखल असल्याने अनेक तरुणांना सरकारी नोकरीला मुकावे लागले आहे.’
मला माणच्या सर्व भागाला पाणी द्यायचे आहे.

वॉटरग्रीड तयार करुन पावसाचे पडणारे पाणी व उचलून आलेले पाणी याचा ताळेबंद करुन सर्व भागाला शाश्‍वत पाणी मिळवून देण्यासाठी मी उभा आहे. पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर एमआयडीसी. आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या विभागात मी काम केल्याने ती कशी उभी करायची, मोठे उद्योग कसे आणायचे याचा मला अनुभव आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही ज्यांना दहा वर्षे दिली त्यांनी काय केलं हे तुम्ही पाहिलं आहे. मी फक्त पाच वर्षे मागत आहे. मी निश्‍चितपणे मतदारसंघात आमूलाग्र बदल घडवून दाखवेन, असा विश्‍वास देशमुख यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.