नवी दिल्ली – माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सीबीआयकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन खळबळ माजवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास आता बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
आपल्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी परमबीर सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
सिंह यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पुनमिया आणि जैन यांना अटक झाली होती. मात्र सिंह यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली नव्हती.