* संधी मिळाल्यास या मतदार संघातील रखडेला विकास पुर्ण करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार
* निवडणूक लढवण्यासाठी रुपवते यांनी घेतल्या दिग्गज राजकिय नेत्यांच्या गाठीभेटी
राजेंद्र वाघमारे
नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आणि माझी गेल्या तीन पिढ्यांपासून नाळ जोडली गेलेली आहे. महाविकास आघाडीला या मतदार संघातून राजकिय दृष्ट्या मोठी सकारात्मक परिस्थिती आहे. उत्तर नगर जिल्ह्यात अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी आता नव्या दमाच्या नेतृत्वाची या मतदार संघात खरी गरज असून महाविकास आघाडीकडून आपण या शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची स्पष्ट कबुली इंदिरा कॉंग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी दैनिक प्रभात’शी संवाद साधतांना दिली.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक असून त्यादृष्टिकोनातून आपण तालुक्यातील जुन्या – जाणत्या जेष्ठ-श्रेष्ठ नेत्यांसह सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून राजकिय चर्चा करुन जनमत अजमवण्याच्या प्रयत्न करत आहोत पक्षाकडून मला संधी मिळाल्यास शिर्डी मतदार संघातील रखडलेला विकास करण्यास मी कटिबध्द राहणार असल्याची माहीती यावेळी कॉंग्रेस नेत्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी बोलतांना दिली.
या शिर्डी लोकसभा मतदार संघात आपण दौरा केला असता महागाई आणि तरुणांमध्ये बेरोजगारी विषयी प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत इंदिरा कॉंग्रेस पक्षाला निश्चित चांगले यश मिळणार असून शिर्डी लोकसभा मतदार संघ हा गेल्या कित्येक वर्षांपासून कॉंग्रेसचे प्राबल्य असलेला हा मतदार संघ अाहे आणि या मतदार संघाशी माझी तीन पिढ्यांपासूनची नाळ जोडलेली असल्यामुळे लोकसभा निवडणूकीत संधी मिळाल्यास मी या मतदार संघातील समस्या सोडविण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलतांना रुपवते यांनी सांगितले.
रुपवते यांनी आपल्या दोन दिवसीय दौऱ्याची सुरुवात नेवासा येथील हेमाडपंथी प्रसिद्ध मोहिनीराज मंदिरात सहकाऱ्यांसोबत दर्शन घेऊन सुरुवात केली यावेळी त्यांनी माजी आमदार व संत ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संभाजीराव फाटके,ज्येष्ठ नेते प्रभाकर बोरकर या राजकिय दिग्गज नेत्यांची भेट घेवून राजकिय रणनिती आखली व तालुक्यातील बेलपिंपळगाव, नेवासा बुद्रुक, वडाळा बहिरोबा, भेंडा, माळीचिंचोरा, पुनतगाव, प्रवरासंगम अशा अनेक गावांना भेटी देत त्यांनी गोरगरीब सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी इंदिरा कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, जिल्हा सरचिटणीस रंजन जाधव,नेवासा तालुका समन्वयक आकाश धनवटे,एस.टी.विभागाचे अध्यक्ष श्याम मोरेंसह अनेक कार्यकर्ते रुपवते यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते.
ताई तुम्ही निवडणूक लढवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत….
इंदिरा कॉंग्रेसच्या नेत्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी दोन दिवशीय नेवासा दौऱ्यात अनेक दिग्गज राजकिय नेत्यांसह गोरगरीबांच्या थेट घरी जावून संवाद साधला असता स्व.प्रेमानंद रुपवते बाबुजींचे गरीब माणसांबाबत असलेले प्रेम आणि आपुलकी ही भावना आम्ही पाहिलेली असून ताई तुम्ही निवडणूक लढवा..आम्ही तुमच्या बरोबर असल्याचे यावेळी तालुक्यातील जनतेने दिलेला शब्द हा राजकिय उर्जा वाढविणारा असल्याचा यावेळी उत्कर्षा रुपवते यांनी यावेळी दैनिक प्रभात’शी बोलतांना अावर्जून उल्लेख केला.