शहरातील रस्त्यांची चाळण 

डांबर टाकून केलीजातेय रस्ते दुरुस्ती

महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या रस्ते दुरुस्तीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. रस्ते दुरूस्त करताना केमीकल कॉक्रीटचा वापर केला जात आहे. मात्र, त्या पूर्वी त्या खड्ड्यातील पाणी न काढताच डांबर मिश्रीत खडी टाकली जात आहे. त्यानंतर ती घट्ट होण्यासाठी अथवा त्यावर दाब टाकण्यासाठी काहीच उपाययोजना न करता हे दुरुस्ती पथक निघून जाते. त्यामुळे या खड्ड्यांवरून वाहने गेल्यानंतर ही खडी विखुरली जाऊन पुन्हा खड्डे पडतात, तर पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे मटेरियल वाहून जात आहे. 

पुणे – महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी केलेली रस्ते दुरुस्ती पहिल्याच पावसात तकलादू ठरल्याने शहरातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. ही दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा केलेला खर्च अवघ्या तीन दिवसांतच वाया गेला आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्ते दुरूस्त करण्यात आले होते. त्या सर्व ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्तीचा खर्च दोनवेळा पाण्यात गेला आहे.
महापालिकेकडून शहरात झालेली रस्ते खोदाईची दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपासूनच खोदाईस बंदी घातली होती.

त्यानंतर जून महिना सुरू होताना, रस्त्यांची कामे 80 टक्‍के पूर्ण झाली असून 7 जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन रस्ते खड्डे मुक्‍त राहतील, असा दावा आयुक्‍त सौरभ राव यांच्यासह पथ विभागाने केला होता. त्यासाठी पावसाळ्याच्या आधी रस्त्यांच्या रिसर्फेसिंग तसेच इतर कामांसाठी 50 कोटींचा खर्च केला होता. मात्र, पालिकेच्या नशिबाने जून महिन्यात शहरात पाऊस झालाच नाही. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसाने अवघ्या आठवड्याभरात रस्ते दुरुस्तीच्या कामाचे पितळ उघडे पडले. त्यावेळी प्रशासनाकडून शहरात झालेली रस्ते खोदाई आणि पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खड्डे पडल्याचा दावा केला. त्यानंतर याचे पडसाद जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या मुख्यसभेतही उमटले.

सर्व पक्षीय नगरसेवकांनी रस्ते खोदाईवरून प्रशासनाला धारेवर धरल्याने या खड्ड्यांची गंभीर दखल घेत, आयुक्‍तांनी तातडीने रस्ते दुरूस्त करून प्रशासनाने रस्त्यांसाठी काय नियोजन केले आहे याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. योगा योगाने त्यानंतर पाऊसही थांबल्याने पालिकेच्या पथ विभागाकडून गेल्या दहा दिवसांत सुमारे 1,700 हून अधिक ठिकाणी खड्डे तसेच रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला, तसेच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडणार नाहीत हे सांगण्यात आले. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पालिकेकडून ज्या ज्या ठिकाणी नव्याने खड्डे दुरूस्त करण्यात आले आहेत, अशा सर्व ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)