…तर भोरमधून थोपटेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

“आघाडी’च्या धर्मानुसार विद्यमानास प्राधान्य; मुळशीला संधी नाही

…मग इंदापूर मतदारसंघ कोणाकडे

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडी धर्मानुसार विद्यमान आमदार असलेल्या पक्षाकडेच तो मतदार संघ कायम राहत असेल आणि विद्यमान आमदाराला प्रथम प्राधान्य दिले जाणार असेल तर इंदापूर मतदार संघ राष्ट्रवादीकडेच ठेवला जाणार की कॉंग्रेसला दिला जाणार? याबाबत चर्चा असून या मतदार संघातील उमेदवारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना की कॉंग्रेसचे माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मिळणार, याबाबतही कोडे निर्माण झाले आहे. हे कोडे आघाडीच्या निर्णयानंतरच सुटू शकेल.

पुणे – जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कॉंग्रेसकडून घेण्यात आल्यानंतर यामध्ये भोर तालुक्‍यात पेच निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु, आघाडीतील जागा वाटपाच्या परंपरागत सुत्रानुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे त्याच पक्षाकडे आणि व्यक्तीला ती जागा कायम राहते. यामुळे भोर ऐवजी मुळशीतील उमेदवारास यावेळी संधी द्यावी, अशी मागणी पक्षाकडून फेटाळली जावू शकते. यामुळे कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती कॉंग्रेसकडून सोमवारी (दि.30) घेण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या पक्ष निरीक्षकांकडे याबाबतचा अहवाल पाठविणार आहे. परंतु, तत्पुर्वीच भोर मतदारसंघाबाबत पेच निर्माण झाल्याने भोरच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते.

भोरमधील उमेदवारालाच संधी दिली जात आहे. याच कारणातून अनेक दशके भोरमध्येच आमदारकी राहिली आहे. यामुळे मतदारसंघात येणाऱ्या मुळशीतील उमेदवाराला संधी द्यावी, अशी आग्रही मागणी माजी खासदार अशोक मोहोळ यांचे चिरंजीव संग्राम मोहोळ यांनी केली. त्यातच डॉ. यमराज पारखी यांनीही उमेदवारी मागितली. यामुळे भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. यापार्श्‍वभूमीवर आघाडी धर्मानुसार जागा वाटपात ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार निवडून आलेला आहे किंवा येत आहे, तो मतदारसंघ त्याच पक्षाकडे तसेच निवडून येणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य दिले जाते.

यानुसार भोरमधून थोपटे यांनाच संधी दिली जावू शकते. भोरमध्ये अनेक दशके कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. माजीमंत्री अनंतराव थोपटे यांच्या माध्यमातून या मतदार संघावर कॉंग्रेसने पकड मिळवली आहे. आमदार थोपटे यांनीही कॉंगेसचा हात सोडला नाही. यामुळे भोरमधून थोपटे यांना डावलून अन्यास उमेदवारी देण्याचा धोका कॉंग्रेस पत्करणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)