महापूर !

पाऊस, खड्डे, भिडे पूल बंद आणि बेशिस्तीचा परिणाम
वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात पोलिसांना अपयश

पुणे – सततच्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते तसेच गल्ली-बोळांत खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे. चारचाकी मोटारी रस्त्यावर असल्याने शहरातील वाहतूक कोलमडून पडली आहे. सोमवारपासून संपूर्ण शहरात झालेली वाहतूक कोंडी फोडण्यास पोलिसांना सपशेल अपयश आले आहे.

खडकवासला धरणातून शनिवारीदेखील विसर्ग करण्यात आला. त्यामुळे डेक्कन तसेच मध्यभागाला जोडणारा बाबा भिडे पूल आणि नांदेड आणि शिवणे गावाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. बाबा भिडे पुलाचा वापर दुचाकीस्वार तसेच रिक्षाचालक करतात. हा मार्ग बंद केल्यानंतर डेक्कन भागात कोंडी झाली.

जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता भागातील वाहतूक संथ सुरू होती. ती सुरळीत करण्यासाठी संभाजी पूल दुचाकींसाठी खुला करण्यात आला. कर्वे रस्ता, महापालिका भवन, बंडगार्डन रस्ता येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे जागोजागी खड्डे पडले आहेत. कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या भागात वर्तुळाकर वाहतुकीचा प्रयोग राबविण्यात आला असला, तरी ताण वाढल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे. मध्य भागातील बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, नारायण पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ भागातील अरूंद रस्त्यांवर कोंडी झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे.

नदीची पातळी वाढल्याने भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता बंद आहे. याचा परिणाम सर्वच रस्त्यांवर होत आहे. यातच एखादी बस किंवा वाहन बंद पडले, तर आणखी मोठा परिणाम होतो. वाहतूक शाखेचे कर्मचारी गर्दीच्या वेळी पेट्रोलिंग करुन समस्या सोडवत आहेत. सर्वच कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावरच आहेत.

– जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (नियोजन), वाहतूक विभाग.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.