घात-अपघातांचा शिंदवणे घाट

पावसाळ्यात दुतर्फा वाहतात पाण्याचे पाट
पायथ्याचे चेक पोस्ट धूळखात
सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर : दुरुस्तीची कामे रखडली

पायथ्याच्या चेकपोस्टला टाळे

शिंदवणे घाटात रात्रीच्या वेळी चोरीचे प्रकार घडले आहेत. घाटामध्ये इतर अनेक गैरप्रकारही घडत आहेत. हे घाटातील गैरप्रकार थांबविण्यासाठी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे चेकपोस्ट कार्यालय घाटाच्या पायथ्याशी आहे. त्या कार्यालयाला कायम टाळे असल्याचे दिसत आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची, वाहनचालकांची सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

उरुळी कांचन – शिंदवणे (ता. हवेली) येथील हद्दीतील हवेली – पुरंदर, सातारा शहराला जोडणारा शिंदवणे घाट हा महत्वपूर्ण समजला जातो. उरुळी कांचन ते जेजुरी मुख्य रस्ता आहे. त्यामुळे शिंदवणे घाटमार्गे रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते. परंतु हाच शिंदवणे घाट वाहतुकीस धोकादायक झाल्याचे समोर आले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. शिंदवणे घाट हा मृत्युचा सापळा असणारा घाट, म्हणून नावारूपास येत आहे.

उरुळी कांचन ते जेजुरी राज्य मार्गावर शिंदवणे घाट आहे. हा घाट चढताना – उतरताना जागेवरच मोठी तीव्र जागेवरची वळणे आहेत. वळणांवर तीव्र चढ-उतार असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. धोकादायक जागेवरच्या तीव्र चढ, उतार व वळणांमुळे अनेक अपघात घडले आहेत. अनेकांना जीव गमवावे लागले आहे. वाहनचालक जखमी होत आहेत. घाटामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने भराव नसल्याने दोन्ही बाजू खचल्या आहेत.

घाटातून डोंगरावरून येणारे पाणी बाजूला काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची बांधकाम विभागाकडून उपाययोजना केली नाही. पावसाळ्यात घाटामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडली आहेत. डोंगर माथ्यावर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. संरक्षण कठडे तुटलेले आहेत. घाटामध्ये वाहनांच्या व वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उभे केलेले दिशादर्शक, सुरक्षितताबाबत फलक जमीनदोस्त झाले आहेत.

जेजुरीमार्ग रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये शिंदवणे घाटाचेही काम दिले आहे. ज्या संबंधित कंत्राटदारांकडे घाटाचे काम आहे. त्यांनी धोकादायक झालेल्या घाटाकडे लक्ष देऊन दुरूस्ती करून घ्यावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे.

– बाबुराव पाचर्णे, आमदार, शिरूर-हवेली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.