पुणे – आपल्या परिसरात पाऊस पडला, गारपीट झाली तरीही ती माहिती आता आपण थेट हवामान विभागाला देऊ शकणार आहात. याबाबत हवामान खात्याने आपल्या संकेतस्थळावर ही सुविधा सुरू केली आहे. त्यात नागरिकांना हवामानाच्या हालचालींचीही नोंद करता येणार आहे.
हवामान खात्याने आपल्या https://mausam.imd.gov.in/ या वेबसाइटवर “पब्लिक ऑब्झर्वेशन’ नावाची विंडो सुरू केली आहे. येथे भेट देऊन कोणीही त्यांच्या क्षेत्रातील स्थानिक हवामान घडामोडींची माहिती देऊ शकतो. यामुळे हवामान खात्याला त्याचा “डेटाबेस’ अधिक तपशीलवार बनविण्यात मदत होणार आहे.
हवामान विभाग आपल्या देशभरातील विविध केंद्रांद्वारे दररोज सर्व हवामान घडामोडींची माहिती आणि अंदाज देत असतो. त्यासाठी सॅटेलाइट इमेजेस आणि “रडार’ इत्यादींचा प्रणालींचा वापर केला जातो. तर, तापमान आणि पावसाचे प्रमाण इत्यादींची हवामान केंद्रांवर नोंद केली जाते. परंतु, काही हंगामी घडामोडी असतात, ज्यांचा प्रभाव मर्यादित क्षेत्रापुरताच असतो. तर, बऱ्याचदा तेथे कोणतेही हवामान केंद्र नसते. त्यामुळे त्या घटना अनेकवेळा रेकॉर्ड केल्या जात नाहीत. किंवा त्यांची कोठेही नोंद नसते.
अशी देऊ शकता माहिती
हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावर public observation नावाची विंडो सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जाऊन त्या राज्य, जिल्हा आणि कोणत्या हंगामात घडलेल्या वेळेची माहिती मागवली जाते. यामध्ये वेगवेगळ्या हंगामी घडामोडींचे कॉलम आहेत, ज्यावर फक्त टिक करून माहिती द्यावी लागेल. यात झाडपडीसारख्या नुकसानीची माहितीदेखील दिली जाऊ शकते.
उपक्रम राबवण्याचे कारण काय?
हवामान विभागाच्या केंद्रांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे सर्व माहिती मिळवण्यास अडचण.
सामान्य नागरिक ठिकठिकाणी उपस्थित असतात.त्यांच्याकडून अधिक अभिप्राय आल्यास विभाग स्वत:च्या माहितीचा उपयोग करून मोठा “डेटाबेस’ तयार होईल.
हवामान खात्याकडे आधीच उपलब्ध असलेल्या आकडेवारीत त्याची सांगड घालून त्यातील त्रुटीही दूर करता येतील.
हवामानविषयक अधिक घडामोडी असलेल्या ठिकाणी हवामान केंद्रदेखील स्थापन केले जाऊ शकते.