- वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार – भोंडवे
- वर्क फ्रॉम होम, शाळकरी मुलांच्या अभ्यासावर परिणाम
पिंपरी – वीज वितरण कंपनीच्या निर्ढावलेल्या यंत्रणेकडून रावेतमधील विजेचा सुरू असलेल्या लपंडावाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. येथील महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिला आहे. सातत्याने वीज गूल होत असल्याने “वर्क फ्रॉम होम’ आणि शाळकरी मुलांच्या ऑनलाइन अभ्यासावर परिणाम होत असल्याचेही भोंडवे यांनी म्हटले आहे.
विजेच्या लपंडावाबाबत भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रावेत परिसरातील यश होम लाइफस्पेस, ऍक्वा ब्लू, सिल्वर ओक, भोंडवे एम्पायर, महालक्ष्मी सोसायटी, मरिना, यश होम नेक्स्ट, भूमी, एलिगन्स, नंदनगिरी, ट्रॉफीकार, सिल्वर गार्डेनिया, जी. के., संतोष ड्रीम, मंगलतीर्थ, आनंदबन या सोसायट्यांसह संपूर्ण शिंदे वस्ती परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरण कंपनीचे चौधरी आणि तळपे या दोन अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदविण्यात आल्या. मात्र, हे दोन्ही अधिकारी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
सध्या या परिसरातील अनेकजण “वर्क फ्रॉम होम’ नोकरदार व विद्यार्थी विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने त्यांच्या कामात सातत्याने अडथळा येत आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष असून आठ दिवसांत विजेचा प्रश्न मार्गी न लावल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असाही इशारा भोंडवे यांनी दिला आहे.
ऊर्जामंत्र्यांकडेही तक्रार करणार
स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची तसेच विजेच्या समस्येबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भोंडवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.