पुणे – काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केली होती. एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला असताना मुंडे यांच्याकडून करण्यात आलेल्या ‘कौतुकामागे’ काही राजकीय अर्थ दडलेत का? असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला होता. काहींनी तर मुंडे शिवसेनेत प्रवेश करतील अशीही अटकळ बांधली होती.
मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज याबाबत प्रतिक्रिया देताना अशा शक्यता फेटाळल्या आहेत. पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी, “ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी देखील अनेक वेळा शरद पवार या वयात किती प्रवास करतात, शेती आणि सहकार विषयातलं ज्ञान यासंबंधी सांगत असतो. आम्ही मंत्री असताना सामान्यांसाठी फोन करुन ते चर्चा करायचे.” असं सांगितलं.
यावेळी त्यांनी महविकास आघाडी सरकारवर टीकाही केली. “आता चांगल्याला चांगलं म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आम्ही ती उचलली आहे. पण महाविकास आघाडीने उचलली नाही. फडणवीसांनी केलेलं सगळं रद्द केलं” अशा शब्दांत त्यांनी महविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊस तोड कामगारांच्या आंदोलनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये हजेरी लावली होती. ही बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” असं ट्विट केलं होत.