नगर -करोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आपल्या देशात चांगले आहे. मात्र, नागरीकांना आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल, असे विचार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक भागानगरे यांनी आज प्रभागातील नागरीकांना होमिओपॅथिक औषधीचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांनी लॉकडाऊन काळात नागरीकांना मोठी मदत केली. त्याचवेळी त्यांनी नगरमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनाच कायम सूचना दिल्या. करोना विषाणूपासून वाचण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक आहे. तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करणेही अत्यंत गरजेचे असल्याची भूमिका भागानगरे यांनी व्यक्त केली.
सारसनगर भागातील केदारवस्ती व शांतीनगर परिसरातील सर्वच नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. डॉ. विकास दळवी यांनी त्या औषधीसंदर्भात नागरीकांना मार्गदर्शन केले. नित्यानंद कांबळे, मनोज साळवे, अनिल भागानगरे, तानाजी गायकवाड आदींनी हा उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले.