नवी दिल्ली : करोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,45,133 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या एका नेत्याला एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा करोना लसीचा डोस देण्यात आल्याची चक्रावून टाकणारी घटना उघड झाली आहे. करोना लसीचे पाच डोस दिलेले असले तरी आता सहावा डोस शेड्यूल असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सरधाना भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रातून हे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय रामपाल सिंह हे बूथ क्रमांक 79 चे भाजपा अध्यक्ष आहेत आणि हिंदू युवा वाहिनीचे सदस्य आहेत. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यावर त्यात त्यांना लसीचे पाच डोस देण्यात आल्याचे लिहिले आहे.
रामपाल सिंह यांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीनंतर या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रामपाल सिंह करोना लसीचा पहिला डोस 16 मार्च रोजी आणि दुसरा 8 मे 2021 रोजी घेतला होता. मात्र जेव्हा त्यांनी अधिकृत पोर्टलवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड केले, तेव्हा त्यामध्ये लसीचे पाच डोस पूर्ण झाले असून सहावा डोस डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान शेड्यूल असल्याचे दिसून आले आहे.
प्रमाणपत्रावर पहिला डोस 16 मार्च आणि दुसरा डोस 8 मे रोजी दाखवत आहे. तर, तिसरा डोस 15 मे आणि चौथा-पाचवा डोस 15 सप्टेंबरला घेतल्याचे दिसत आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी अखिलेश मोहन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लसीसाठी कोणाकडून दोनपेक्षा जास्त वेळा नोंदणी झाल्याची ही पहिलीच घटना आहे.