पुणे – पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करावे, या मागणीचे निवेदन पुणे बार असोसिएशनतर्फे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले. यावर सकारात्मक चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, सचिव ऍड. सुरेखा भोसले, कार्यकारिणी सदस्य ऍड. सई देशमुख, ऍड. काजल कवडे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शाहिर अख्तर, ऍड. मंगेश लेंडघर, ऍड. फैय्याज शेख, ऍड. राहुल ढाले, ऍड. अतिश लांडगे, ऍड. सचिन गेलडा यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते. सर्वप्रथम संसद भवन येथे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टबद्दल बोलल्याबद्दल पटोले यांचे अभिनंदन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक खटले मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहेत. न्याय मिळविण्यासाठी नागरिकांना मुंबई येथे जावे लागत आहे. याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचीही तिच अवस्था आहे. 1978 मध्ये पुणे आणि औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू होण्याबाबतचा ठराव विधी मंडळात मंजुर झाला आहे. त्यानंतर 1981 मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले आहे. पुणे येथे अद्याप सुरू झालेले नाही. येथे सर्किट बेंच सुरू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.