पुणे -करोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळ सण साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना महापालिकेकडून गुरुवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात, प्रार्थनेसाठी चर्चमध्ये केवळ 50 व्यक्तींनाच मूभा देण्यात आली असून 31 डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये होणारी प्रार्थना सायंकाळी सात वाजता घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात करोनाच्या रुग्णांचा आकडा घटला आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप या साथीचे रुग्ण शहरात सापडतच आहेत. त्यामुळे ख्रिसमसमुळे गर्दी झाल्यास या साथीचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेनेही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
या आहेत मार्गदर्शक सूचना
चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना घ्यावी.
चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची सुविधा असावी, मास्कचा वापर करावा
चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तूतीगीत गाण्यासाठी केवळ 10 गायकांचा वापर करावा.
चर्चच्या आतमध्ये तसेच बाहेरील बाजूस स्टॉल, दुकाने लावू नयेत.
60 वर्षांवरील नागरिक तसेच 10 वर्षांखालील मुलांनी घरीच सण साजरा करावा.
ऑनलाइन प्रार्थना, तसेच मेसेजची सुविधा उपलब्धता करावी.
सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर गर्दी करू नये.
धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम अथवा मिरवणुकीचे आयोजन करू नये.