मॉलमध्येच आंदोलन करण्याची आंदोलनकर्त्यांची अभिनव पद्धत
हॉंगकॉंग -हॉंगकॉंगमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ख्रिसमसच्या आनंदोत्सवालाही गालबोट लागले आहे. ख्रिसमसच्या सुटीनिमित्त खरेदीसाठी मॉलमध्ये गर्दी केलेले नागरिक, आंदोलक आणि पोलिसांमध्ये मॉलमध्येच संघर्ष झाला आहे. सलग तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी संघर्षाच्या घटना हॉंगकॉंगमध्ये घडल्या आहेत. गुरुवारीही आंदोलकांनी वेगवेगळ्या मॉलमध्ये सरकारविरोधी घोषणा देऊन आंदोलन केले. ताई पो जिल्ह्यातल्या एका मॉलमधून दंगलविरोधी पोलिसांनी डझनवारी आंदोलकांना हुसकावून बाहेर काढले. त्यासाठी पोलिसांना मिरचीचा स्प्रे फवारावा लागला होता. संशयित आंदोलकांना ओळखण्यासाठी त्यांच्यावर निळ्या रंगाचा स्प्रे मारण्यात आला होता, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
आर्थिक उलाढालीमध्ये अडथळा आणण्यासाठी आंदोलक मॉलमध्येच आंदोलन करत आहेत. आंदोलनामुळे दक्षिण आशियातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या हॉंगकॉंगमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक मॉलमध्ये नियमितपणे आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लोकशाहीवादी उमेदवारांना मोठा विजय मिळाल्यावर हे आंदोलनाचे प्रमाण घटले होते. मात्र अजूनही चीन आणि हॉंगकॉंगच्या प्रशासनाकडून अजूनही स्थानिक पातळीवर अधिक सवलत दिली जात नाही आहे. परिणामी आंदोलने पुन्हा सुरू झाली आहेत. बुधवारी ख्रिसमसच्या दिवशीही ही हिंसक आंदोलन झाली. आंदोलनकांनी ख्रिसमसची वाट लावल्याची टीका कार्यकारी अधिकारी कॅरी लाम यांनी केली आहे.