पोलीस व वनरक्षकांचे प्रयत्न
रात्रीच्या अंधारात तब्बल आठ तास आगीशी झुंज
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे व परंदवडी हद्दीतील चौराई डोंगरावर लागलेला वनवा पोलीस व वनरक्षकांनी शर्थीचे प्रयत्न करुन विझविला. चार अज्ञात इसमांनी येथील डोंगरावर आग लावली होती. याची माहिती मिळताच वनरक्षक रेखा संभाजी वाघमारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून हा भडकलेला वणवा विझविला. जवळपास आठ तास या वणव्यामुळे चौराई डोंगरावरील दहा एकरपेक्षा अधिक वनक्षेत्र जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वनरक्षक रेखा वाघमारे या दुपारपासून डोंगरावर लागलेला वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र मनुष्यबळा अभावी त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी धोका पत्करून द्रुतगती मार्गाच्या बाजूने रात्रीच्या अंधारात चौराई डोंगरावर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. रात्री सुमारे आठ तासांच्या प्रयत्नानंतर डोंगरावर ठिकठिकाणी लागलेली आग विझवण्यात त्यांना यश आले. याबाबत वनरक्षक रेखा वाघमारे यांनी तळेगाव दाभाडे आणि परंदवाडी पोलिस ठाण्यात वणवा लावणाऱ्या अज्ञाताबद्दल माहिती देऊन फिर्याद नोंदवण्याची विनंती केली. या कामात वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कायदा सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षाव्यवस्था राखण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी वनखात्याला ऐनवेळी दिलेल्या मदतीमुळे संभाव्य मोठी नैसर्गिक हानी टाळता आली.
पर्यावरणासाठी महिला अधिकाऱ्यांचे प्रयत्न
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली आग जागतिक पर्यावरणासाठी धोकादायक ठरली होती. मावळ हा निसर्गाने नटलेला परिसर असून येथील डोंगर, झाडे, वनस्पती आसपासच्या परिसरातील पर्यावरणाचा समतोल राबण्यात खूप मोठी भूमिका बजावतात. दहा एकरापेक्षा अधिक भागात लागलेली ही आग आणखी पसरली असती तर येथील वन, प्राणी आणि पर्यावरणास मोठे नुकसान झाले असते. या बाबी ध्यानात घेऊन महिला वन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मोठे धाडस दाखविले आणि शर्थीचे प्रयत्नही केले. रात्रीच्या अंधारात प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आगीवर नियंत्रण मिळविणाऱ्या दोन महिला अधिकारी आणि सर्व वन व पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.