#प्रभात_जनसंवाद : आपल्या परिसरातील समस्या हक्काने मांडा

आपल्या भागातील समस्या आम्हाला पाठवा आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी देऊ. प्रभात मधून सुरू झालेला जनसंवाद प्रशासन जागे होईपर्यंत सुरूच राहील…

सदाशिव पेठ
ज्ञान प्रबोधिनी येथे सुरु करण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयात एकही वर्तमानपत्र वाचायला नसते. याठिकाणी वृत्तपत्र पुन्हा ठेवण्याची व्यवस्था करावी अन्यथा हे वाचनालय बंद करावे म्हणजे तेथे घाण होणार नाही.
विनोद जैन – 9422305735


धानोरी
कळसमधील स.नं116/1, जाधववस्ती येथे असलेल्या इमारतींच्या एक फुट अंतरावरच विद्युतवाहक तारा आहेत. ही इमारत जुन्या पध्दतीची लाकडी माळवदाची आहे. याठिकाणी बराच वेळा स्पार्क होते. एखादी ठिणगी घरात उडाली तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेतली नाही.
अनिल वाटाडे – 9689611874


गोकुळनगर
धानोरीतील मुख्य रस्त्याचा पादचारी मार्ग (फुटपाथ) बऱ्याच ठिकाणी दुकानदारांनी गिळंकृत केलेला दिसतो. फुटपाथवर हातगाडीवाले तसेच पथारी व्यावसायिक बऱ्याच ठिकाणी दुकान थाटून आहेत. किराणा,फर्निचर व स्टेशनरी दुकानांचा बराचसा माल फुटपाथवर ठेवलेला दिसतो. फुटपाथवर चालण्यास जागा शिल्लक नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
दिलीप डाळींबकर – 9850957027


पर्वती
पर्वती विभाग व्यापारी मेळावा उत्साहात
पर्वती विभाग व्यापारी संघटनेचा व्यापारी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात पुणे शहर अध्यक्ष महेशजी खोपडे यांनी मार्गदर्शन केले, तसेच व्यापारी मित्रांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी खोपडे म्हणाले, रात्रीच्यावेळी दुकानाचे शटर उचकटून चोऱ्या होतातच. पण, आता दुकानात येऊन हात चलाखीने गोड बोलून माल चोरून नेण्याचे प्रकार सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे सर्वांनीच सीसीटिव्ही कॅमेरे बसवा तसेच एक कॅमेरा रस्त्याच्यादिशेने सुद्धा लावा. यावेळी महेश खोपडे, आनंद बाफना, कैलास जोशी,सतीश पवार, प्रवीण चव्हाण, काशिनाथ चव्हाण, दीपक घुबे, केदार ओझा, मुकेश छाजेड, अशोक परिहार, भुराराम जोशी आणि पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. पर्वती विभाग अध्यक्ष आनंद बाफना यांनी आभार मानले.
कैलास जोशी – 9970770570


पुणे
स्वतंत्र दिव्यांग आयोगाची निर्मिती करा
सर्वसामान्य नागरिकांना जो हक्क मिळतो तोच सन्मान आणि हक्क दिव्यागांना मिळालाच पाहिजे. केंद्रशासन, महाराष्ट्र शासन दिव्यांगांसाठी शासकीय योजना राबवत असताना त्यांचा निधी फार कमी आहे. महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर असून दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिव्यांग आयोगाची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली सर्व ओळखपत्र ग्राह्य धरली पाहिजे, आजही ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रमाणपत्र वेळेत मिळत नाहीत. त्यांना पुण्याला जाऊन काढावे लागत आहेत. आता दिव्यांगांचे प्रकारांमध्ये वाढ केली, पण त्यांचे प्रमाणपत्रासाठी सहा महिने थांबावे लागत आहे. कारण पहिली ऑनलाइन नाव नोंदणी करावी लागते, दिव्यागांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. दिव्यांगांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम प्रभावीपणे होईल.
ज्ञानेश्‍वर शिंदे – 8983153119


हडपसर
रेल्वे क्रॉसिंगची ट्रॅफिक कधी सुटणार ?
ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग येथील ट्रॅफिक अवघड जागेचे दुखणे होऊन बसलय कितीही मलमपट्टी करा दुखणं काही थांबायला तयार नाही. लोक अक्षरशः रडकुंडीला येत आहेत. दुचाकी चालवताना तर चालकांना कसरत करावी लागत आहे…, हे थांबणे आवश्‍यक आहे यावर उपाय निघणे आवश्‍यक आहे. हा त्रास कधी थांबणार?
वैभव माने पाटील – 9860201750

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.