पीडीत युवतीचा पत्रकार परिषदेत
आरोपशाहजहानपूर : भाजपचे नेते चिन्मयानंद यांनीच आपल्यावर बलात्कार केला आणि एक वर्षभर शारीरिक छळ केला असा आरोप पीडीत विद्यार्थिनीने केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना या विद्यार्थिनीने आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. या पत्रकार परिषदेच्यावेळी या युवतीचा चेहरा काळ्या स्कार्फने झाकला होता.
या युवतीने चिन्मयानंदांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. लोधी रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे आणि शाहजनपूर येथील पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे हे प्रकरण हस्तांतरित केले आहे, असे दिल्लीतल्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
“एसआयटी’ने तब्बल 11 तास आपली चौकशी केली आणि आपण त्यांना सर्वकाही सांगितले आहे. त्यांना सर्वकाही सांगूनही अद्याप चिन्मयानंदांना अटक केली गेलेली नाही, असेही या युवतीने सांगितले. शारीरिक छळाची तक्रार नोंदवण्यास गेलेल्या आपल्या वडिलांना शाहजहानपूर जिल्हा दंडाधिकारी इंद्र विक्रम सिंह यांनी धमकावले आणि “बेपत्ता असल्याची’ तक्रार दाखल करण्यास सांगितले. आपल्याला ज्या हॉटेलमध्ये ठेवले गेले होते, ते आता प्रसिद्धी माध्यमांसमोर उघडले जावे. याशिवाय चिन्मयानंदांच्या व्हिडीओ क्लीपचे पुरावेही देण्यास आपण तयार असल्याचे या युवतीने सांगितले.