अफगाणिस्तानकडून बांगलादेशचा धुव्वा

चितगॉंग: विश्‍वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांना शर्थीची झुंज देणाऱ्या अफगाणिस्ताने बांगलादेशचा 224 धावांनी धुव्वा उडविला आणि या दोन संघांमधील एकमेव कसोटीत एकतर्फी विजय मिळविला.

बांगलादेशला विजयासाठी 398 धावांचे आव्हान मिळाले होते. त्यास सामोरे जाताना त्यांचा दुसरा डाव 173 धावांमध्ये कोसळला. शकीब अल हसन (44) व शादमन इस्लाम (41) यांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. अफगाणिस्तानच्या रशीद खानने पहिल्या डावात 5 गडी व दुसऱ्या डावात 6 गडी बाद करीत कौतुकास्पद कामगिरी केली. त्याचा सहकारी रहमत शाहने पहिल्या डावात शतक झळकावित संघास पहिल्या डावातच नियंत्रण मिळवून दिले होते. अफगाणिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटींमध्ये हा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी आयर्लंडविरूद्ध कसोटी सामना जिंकला होता. भारताविरूद्धच्या कसोटीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

संक्षिप्त धावफलक- अफगाणिस्तान पहिला डाव 342 (रहमत शाह 102, असगर अफगाण 92, रशीद खान 51, तैजुल इस्लाम 4-116) व दुसरा डाव 260 (इब्राहिम झाद्रान 87, असगर अफगाण 50, शकीब अल हसन 3-58)
बांगलादेश पहिला डाव 205 (मोमिउल हक 52, मोसादिक हुसेन नाबाद 48, रशीद खान 5-55, मोहम्मद नबी 3-56) व दुसरा डाव 173 (शकीब अल हसन 44, शादमन इस्लाम 41, रशीद खान 6-49, झहीर खान 3-59)

Leave A Reply

Your email address will not be published.