वॉशिंग्टन – चीनने हेतूपुरस्सर “करोना व्हायरस’ची माहिती जगापासून लपवून ठेवल्याने जगभरात जीवघेणा साथरोग पसरला आणि आर्थिक नुकसानीबरोबर लाखो जीव गेल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला होता. यावरून चीनी व्हायरस संबोधल्याने दोन देशांमध्ये वाक्युद्धही रंगले होते. आता या युद्धाने सायबर हल्ल्यांपर्यंत मजल मारली असल्याचा आरोप अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने केला आहे.
डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार चीनी हॅकरांना अमेरिकेच्या हॉस्पिटल आणि लॅबवर हल्ला करायचा आहे. याची चिंता प्रशासनाला आहे. जॉन डेमर या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या व्हायरसच्या लसीवर बायोमेडिकल संशोधन सुरु आहे. त्याशिवाय आता काही कोणत्यारही देशाला महत्वाचे नाहीय. जो देश या महामारीचे रामबाण औषध शोधून काढेल त्याची इतिहासात मोठी नोंद होणार आहे. यामुळे चीन यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे.
चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. यामुळे त्यांनी ही माहिती मिळविण्यासाठी सायबर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या एजन्सी आणि मेडिकल संस्थांवर सायबर हल्ले वाढू लागले आहेत. यामुळे हॉस्पिटल, रिसर्च लॅब, हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि फार्मास्युटीकल कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे.
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेसवर दररोज सायबर हल्ले होऊ लागले आहेत. जगात दोन जागा अशा आहेत की या डिपार्टमेंटवर अशा प्रकारचे हल्ले करू शकतात. त्यापैकी चीनवर आमचा संशय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरा देश रशिया असे या अधिकाऱ्याला अप्रत्यक्षपणे म्हणायचे होते.