बीजिंग – दक्षिण कोरियाच्या प्रवाशांना व्हिसा देणे चीनने स्थगित केले आहे. दक्षिण कोरियाने चिनी प्रवाशांना आपल्या देशात येण्यापूर्वी करोना चाचण्या अनिवार्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ चीनने हे पाऊल उचलले आहे.
चीनच्या प्रवाशांवर पक्षपातीपणे घालण्यात आलेले नियम जोपर्यंत हटवले जाणार नाहीत, तोपर्यंत दक्षिण कोरियाच्या प्रवाशांना व्हिसा बंदी लागू असेल, असे दक्षिण कोरियातील चिनी दूतावासाने ऑनलाईन पोस्ट केलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. या नोटीसीमध्ये अन्य कोणताही तपशील देण्यात आलेला नाही.
चीनच्या या निर्बंधांचा फटका जपानी प्रवाशांनाही बसणार आहे, असे जपानी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या नियमांची आपल्याला माहिती असून चिनी प्रशासनाशी अनौपचारिक चर्चा सुरू असल्याचे जपानी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. संभाव्या उपाययोजनेबाबत चिनी प्रशासनाकडून विचार सुरू आहेत. जर जपानी प्रवाशांवरही व्हिसाचे निर्बंध घातले गेले तर त्याबद्दल आपल्याला खेद असेल, असेही जपानच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
डझनभर देशांकडून चिनी प्रवाशांना करोना चाचण्यां अनिवार्य…
चिनी प्रवाशांना ज्या देशात प्रवेशापूर्वी करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, त्या सर्व देशांविरोधात अशाप्रकारचे निर्बंध घालण्याची धमकी चीनने दिली आहे. दक्षिण कोरिया आणि जपान व्यतिरिक्त अन्य डझनभर देशांनी चिनी प्रवाशांना आपल्या देशात प्रवेश करण्याच्या 48 तास पूर्वी केलेल्या करोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करण्याचे बंधन घातले आहे.
चीनमध्ये करोना साथ पुन्हा पसरायला लागत असल्याने या देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्बंध घातले आहेत. मात्र चीनमधील करोना रुग्णांची खरी आकडेवारी चीनकडून उघड केली जात नसल्याचा आरोप होतो आहे. चीनने ही आकडेवारी स्वतःहून जाहीर करावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने चीनला केले आहे.