नवी दिल्ली – प्रत्यक्ष ताबा रेषा (एलएसी) म्हणजेच सीमेलगतच्या हालचाली चीनने सुरूच ठेवल्या आहेत. आता लष्करी डावपेचांच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पूर्व लडाखमधील पॅंगॉंग तलावाजवळ चीन दुसरा पुल उभारत असल्याचे उघड झाले आहे.
उपग्रह छायाचित्रांवरून चीनच्या हालचाली सुरूच असल्याचे समोर आले.
चीनी कुरापतींमुळे दोन वर्षांपासून सीमेलगत तणावाची स्थिती आहे. चीनी सैन्याच्या हालचाली विचारात घेऊन भारतीय जवानांनी याआधीच पॅंगॉंग तलावालगतच्या आपल्या बाजूकडील उंचावरील ठिकाणांवरील मोर्चेबांधणी मजबूत केली.
त्याशिवाय, भारतानेही रस्ते, पुल आणि बोगद्यांच्या बांधणीचे काम वेगाने हाती घेतले आहे. अशात चीनने पहिल्या पुलाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पुलाचे काम सुरू केल्याचे उघड झाले.
पहिल्या पुलाला समांतर असा दुसरा पुल चीन बनवत आहे. त्यामुळे चीनी सैनिकांना वेगवान हालचाली करणे शक्य होईल. सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारत आणि चीनमध्ये आतापर्यंत लष्करी पातळीवर चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या. त्यामुळे वादाचे कारण असलेल्या काही ठिकाणांवरून दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले. मात्र, अद्याप पूर्ण सैन्यमाघार झालेली नाही.