वॉशिंग्टन – पाकिस्तान आणि चीनच्या संभाव्य धोक्याचा विचार करून भारताकडून या वर्षी जूनमध्ये रशियन बनावटीची एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली जाऊ शकेल, असा अंदाज अमेरिकेची संरक्षण संस्था पेंटॅगॉनने व्यक्त केला आहे. भारताकडून सध्या व्यापक लष्करी आधुनिकता करण्याचे धोरण स्विकारले गेले आहे. त्यामुळे ही शक्यता असल्याचे पेंटॅगॉनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी संसदेतील वार्तालापादरम्यान सांगितले.
भारताला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून रशियन बनावटीच्या एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळायला सुरुवात झाली आहे, असे संरक्षण गुप्तचर संस्थेचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियर यांनी सिनेट सशस्त्र सेवा समितीच्या सदस्यांना सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून भारतीय लष्कराने भू-सागरी सीमांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक टेहळणी यंत्रणा घ्यायला सुरुवात केली आहे. याशिवाय सायबर क्षमतांचाही विकास करायला सुरुवात केली आहे. डिसेंबर महिन्यात भारताला एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम मिळाली. चीन आणि पाकिस्तानच्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी या वर्षी जूनमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे बेरियर यांनी सांगितले.
भारताने स्वतःची हायपरसोनिक, बॅलिस्टिक, क्रूझ आणि हवाई संरक्षक क्षेपणास्त्र क्षमता विकसित करायलाही सुरुवात केली आहे. 2021 मध्ये त्याच्या काही चाचण्याही घेतल्या आहेत. अवकाशात भारताचे उपग्रह वाढत आहेत. अंतराळातील मारक क्षमताही भारत वाढवत आहे. यासाठी देशांतर्गत तंत्रज्ञानावर भारत अधिक भर देत आहे. तिन्ही सशस्त्र दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकात्मिक थिएटर कमांड विकसित करण्याचाही भारताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन्ही सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्याचेही बेरियर यांनी सांगितले.