राजगुरूनगर – खेड पंचायत समिती इमारतीच्या 13.90 कोटींच्या प्रस्तावास राज्याच्या ग्रामीण विकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बहुप्रतिक्षित इमारतीचा भूमिपूजन होणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी फोनवरून तर जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. खास बाब म्हणजे माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा शासन निर्णय जाहीर केल्याने स्व.गोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
इमारतीला मान्यता मिळताच बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 27) खेड पंचायत समितीच्या आवारात फटाके फोडून, लाडू वाटून आनंद साजरा केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख तथा खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, माजी उपसभापती व महिला तालुका प्रमुख ज्योती अरगडे, शेतकरी संघटना तालुका प्रमुख संभाजीराजे कुडेकर, युवा सेनेचे धनंजय पठारे, संगीता होरे, दत्ता राऊत, विशाल पोतले, अमोल इंगळे, ज्येष्ठ नेते मारुती सातकर, अकबर वाळुंज, सरपंच वैभव गावडे, संतोष गार्डी बबलू काजळे, मयूर रणपिसे आदी उपस्थित होते.
तत्कालीन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या प्रयत्नांमुळे 14 सप्टेंबर 2019 मध्ये पाच कोटी रकमेच्या खेड पंचायत समिती इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर कामाची निविदा प्रसिद्ध होऊन पात्र ठेकेदाराला जिल्हा परिषदेकडून कार्यारंभ आदेश देत आढळराव पाटील, सुरेश गोरे व खेड तालुक्यातील शिवसैनिकांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, दिलीप मोहिते आमदार झाल्यावर त्यांनी सदर जागेवर इमारत बांधण्यास विरोध केल्यानंतर शिवसेना विरुद्ध आमदार मोहिते असा तीव्र संघर्ष झाल्याने हे काम ठप्प झाले होते.
“माजी खासदार शिवाजीराव आढळाराव पाटील यांनी याप्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात समक्ष भेट घेऊन खेड तालुक्याच्या अस्मितेचा विषय असलेल्या या कामास तात्काळ निधी उपलब्ध करून मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी केली. त्यास यश येऊन खेड पंचायत समिती इमारतीच्या 13.90 कोटी रकमेच्या कामास मंजुरीचा शासन निर्णय आज ग्रामीण विकास विभागाने पारित केला आहे.”
– भगवान पोखरकर, माजी सभापती, खेड पंचायत समिती
“जनतेच्या हक्काच्या सरकारने तब्बल 13.90 कोटीचा निधी मंजूर करून संपूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांना आनंदाची बातमी दिली आहे. भविष्यात सर्व शासकीय विभाग एकाच ठिकाणी आणण्यासाठी खेड तालुका प्रशासकीय इमारतीसाठी व्यक्तिशः राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार
दुमजली इमारतीत हे असणार
सुमारे 31 हजार स्क्वेअर फुट बांधकाम असलेल्या या अद्यावत खेड पंचायत समितीच्या दुमजली इमारतीमध्ये तळमजल्यावर प्रशस्त वाहन पार्किंग सुविधा व सुरक्षा व्यवस्था असेल. पहिल्या मजल्यावर गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांचे प्रशस्त कार्यालय असेल. यासह व्यवस्थापन व पंचायत विभाग, अर्थ, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, पशुवैद्यक विभाग, मनरेगा, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, छोटे पाटबंधारे विभाग, डीआरडीओ व संगणक कक्ष आदी विभागांची स्वतंत्र सुसज्ज कार्यालये इमारतीत असतील. याशिवाय सुमारे 250 आसन क्षमतेच्या बहुउद्देशीय सभागृहासह दोन स्वतंत्र सार्वजनिक शौचालये देखील इमारतीत असणार आहेत.