दौंड तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रम
कुरकुंभ – पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने दौंड तालुक्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दौंड 1 ग्रामीण प्रकल्पातील 21 बालकांसाठी शुक्रवार (दि. 23) पासून पुढील 50 दिवसांकरिता सुरू करण्यात आली आहे.
अंगणवाडी केंद्रा अंतर्गत ग्राम बाल विकास केंद्रे 50 दिवसांकरीता सुरू आहेत. आहार व अतिरिक्त मानधनासाठी प्रति बालक 50 दिवसांचे ग्राम बालविकास केंद्राकरिता 2 हजार 155 रुपये प्रमाणे आगाऊ निधी अंगणवाडी सेवकांच्या खात्यावर जमा करण्यात येतो.
केंद्राचे वेळापत्रक पुढील प्रमाणे –
सकाळी 8 वाजता नाचणी खीर, गहू सत्व खीर, सकाळी 10 वा अंगणवाडीतील आहार, दुपारी 12 वा- अंगणवाडीतील आहार, दुपारी 2 वा मेथी मुठीया, कोथिंबीर मुठीया, सायंकाळी 4 वाजता केळी, 6 वा-मसाला इडली व मुरमुरा लाडू किंवा उतप्पा व मुरमुरा लाडू आणि रात्री 8 वा-थालीपीठ.
जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जामसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय दौंड 1 तालुक्यात कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडी केंद्रा अंतर्गत ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. 21 बालकांच्या पालकांना शासनाकडून देण्यात आलेल्या औषधाबाबत आणि 50 दिवसांकरिता देण्यात येणाऱ्या आहारा बाबत मार्गदर्शन केले आहे.
– अक्षदा शिंदे,
प्रकल्प अधिकारी दौंड