मुंबई : देशभरात करोना संसर्ग झपाट्यानं वाढत असून महाराष्ट्रातील रुग्ण वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत रुग्ण झपाट्याने वाढत असून लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे.
राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडस ची संख्या वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला ५० हजार स्वॅबचे संकलन होत आहे. संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.