माण मतदारसंघ नाही दिला तर मुख्यमंत्र्यांकडून नागपूर घेणार

महादेव जानकर; माणला दुष्काळमुक्त करण्याचे काम करणार, पैसे कमी पडू देणार नाही

मलवडी- विधानसभा निवडणुकीत मला माण मतदारसंघ नाही दिला तर मी मुख्यमंत्र्यांकडून नागपूर मागून घेईन, आम्ही भाजपच्या तिकीटावर लढणार नाही. आम्ही आमच्या तिकीटावर लढणार आहे, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. शेळ्या- मेंढ्यांच्या चारा छावणीची तरतूद मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार केली.

या सरकारमुळेच सातारा- पंढरपूर चौपदरी रस्ता, सातारचं वैद्यकीय महाविद्यालय होतेय. म्हसवड, वडूज व दहिवडी येथे औद्योगिक वसाहत सुरु करायला मंजुरी लवकरच मिळेल. डेअरी कॉलेज म्हसवड येथे होत आहे. पशुविषयक संशोधन केंद्र माण-खटावमध्ये करणार आहे. अजून पंधरा वर्षे आम्ही सत्तेतून हलणार नाही. त्यामुळे विकासाच्या गंगेच्या फायदा करुन घ्या. माणला दुष्काळमुक्त करण्याचं काम आम्ही करणार आहे. पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील पहिली शेळ्या-मेंढ्यांची चारा छावणी पिंगळी बुद्रुक (ता. माण) येथे माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी आज सुरु झाली. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक बाळासाहेब खाडे, राष्ट्रवादीचे माण मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. संदीप पोळ, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य रणजितसिंह देशमुख, भाजपचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, विकल्प शहा, दादासाहेब दोरगे, नगरसेवक गणेश रसाळ, विजयकुमार साखरे, अनिल सुभेदार, बबनराव विरकर, रणधीर जाधव, पृथ्वीराज गोडसे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार बी. एस. माने, गटशिक्षणाधिकारी गोरख शेलार आदी मान्यवर उपस्थितीत होते.

माण- खटावमधील 132 अधिकारी मंत्रालयात आहेत. तुमच्या मनातील स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करु. धनगर समाजाला जात म्हणून निधी प्रथम या सरकारने दिला. धनगर समाजाने फक्त मेंढपाळ म्हणून न राहता उद्योजक बनण्यासाठी महामंडळात तरतूद केली, असे जानकर यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला, असे बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. रणजितसिंह देशमुख म्हणाले, “”माणमध्ये माणदेशी सुतगिरणीच्या माध्यमातून वीस व खटावमध्ये हरणाईच्या माध्यमातून सोळा छावण्या सुरु आहेत. येळगावकर व देसाई यांनी टेंभूचं पाणी आणले. पण गेली दहा वर्षे माणमध्ये इंजिनिअरींग कॉलेज काढू, कारखाने उभारु म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने साधं ऊसाचं गरुहाळ सुरु केलं नाही.

आम्ही मात्र माण-खटावमध्ये सुतगिरण्या सुरु करुन चांगल्या पध्दतीने चालवल्या. गाजावाजा केलेल्या पृथ्वी बंधाऱ्याचा नक्की काय उपयोग झाला याचा विचार करण्याची गरज आहे.” ज्या आंधळी धरणात पाणी नाही तिथे जॅकवेलच्या कामाचा शुभारंभ करण्याची बनवेगिरी सुरु आहे. जिहे-कटापूरची योजना चारमाही असून ती आठमाही झाल्याशिवाय माणच्या उत्तर भागाला पाणी मिळू शकत नाहीत. मार्डी भागाला फक्त निरा-देवधर मधूनच पाणी मिळू शकतं.

त्यामुळे आता जे सुरु आहे ते नुसतं मनोरंजन आहे, अशी टीका डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केली. निरा देवधरचं पाणी फलटणनंतर माणलाच मिळालं पाहिजे, त्यानंतर माळशिरसला. चंद्रकांत पाटील यांनी मदत पुनर्वसनमधून दहा कोटी दिले म्हणून टेंभूचं पाणी वरकुटे-मलवडी व मायणी परिसरात मिळाले, असा दावा त्यांनी केला. जिहे-कटापूर व टेंभूच्या माध्यमातून माण-खटावचा दुष्काळ हटवायची धमक फक्त महायुतीच्या सरकारमध्येच आहे, अस ेअनिल देसाई यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.